अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव परिसरात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 12 जण गंभीर जखमी असून 5 जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. नवरात्रोत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती घेऊन परतणाऱ्या मंडळाच्या सदस्यांसोबत दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे वर्ध्यातील सिंदी मेघे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सिंदी मेघे येथील नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य दरवर्षीप्रमाणे यंदाही शेगाव येथून देवीची मोठी मूर्ती आणण्यासाठी गेले होते. बोलेरो पिकअप वाहनातून मूर्ती घेऊन हे सदस्य वर्ध्याच्या दिशेने परतत होते. रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास धामणगावजवळ हा अपघात झाला.

समृद्धी महामार्गावरील चॅनल 97 जवळ बोलेरो पिकअपला मागून आलेल्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे. धडक एवढी भीषण होती की या दुर्घटनेत 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. काही गंभीर जखमींवर सावंगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कंटेनरचा वेग किती होता आणि चालकाकडून काही निष्काळजीपणा झाला का, याचा तपास पोलीस करत आहेत. मृतांमध्ये घनश्याम पाटील, ओम गावंडे, सचिन बादमनवार, प्रवीण बकाने आणि दत्ता कुळसंगे यांच्यासह आणखी 2 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.






