अमेरिका : सोशल मीडियावर एका भारतीय विद्यार्थ्यांचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेतील नेवार्क विमानतळावरचा असल्याची माहिती समोर येत आहे. या व्हिडिओमध्ये त्या विद्यार्थ्याला अमानुष वागणुक दिल्याने भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भारतीय दूतावासही सक्रिय झाले असून, या प्रकरणाचा तपास करत आहेत.

व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे अमेरिकेतील नेवार्क विमानतळावर भारतीय विद्यार्थ्याला एका गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात आहे. त्याला एका गुन्हेगारासारखे हातात बेड्या घालून जमिनीवर पाडण्यात आले, व त्याची गुन्हेगारासारखी चौकशी करण्यात आली. आणि त्याला भारतात परत पाठवण्यात आले.
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ अमेरिकेतील उद्योजक कुणाल जैन यांनी शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करत त्यांनी याठिकाणी घडलेला सर्व प्रकारबद्दल देखील सांगितला आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘या घटनेचे वर्णन मी स्वतः पाहिल्याप्रमाणे केले आहे. मी काल रात्री नेवार्क विमानतळावर होतो. यावेळी मी एका तरुण भारतीय विद्यार्थ्याला हद्दपार होताना पाहिले. त्याला हातकड्या लावण्यात आल्या होत्या…तो रडत होता…त्याला गुन्हेगारासारखे वागवले जात होते. स्वप्नाचा पाठलाग करत तो अमेरिकेत आला होता, कोणालाही इजा पोहोचवण्यासाठी नाही. एक भारतीय म्हणून मला असहाय्य आणि दुःखी वाटते. ही एक मानवी शोकांतिका आहे. ‘
I witnessed a young Indian student being deported from Newark Airport last night— handcuffed, crying, treated like a criminal. He came chasing dreams, not causing harm. As an NRI, I felt helpless and heartbroken. This is a human tragedy. @IndianEmbassyUS #immigrationraids pic.twitter.com/0cINhd0xU1
— Kunal Jain (@SONOFINDIA) June 8, 2025
पुढे त्यांनी लिहिले की, ‘भारतीय विद्यार्थी नुकताच विमानातून उतरला होता, परंतु तो इमिग्रेशन अधिकाऱ्यांना त्याचे भेट देण्याचे कारण सांगू शकला नाही आणि म्हणून तेथील अधिकाऱ्यांनी त्याला गुन्हेगारासारखी वागणूक दिली. अशी अनेक मुले आहेत जी अमेरिकेला सकाळी येतात आणि नंतर त्यांना हातपाय बांधून संध्याकाळच्या विमानाने परत पाठवले जाते. दररोज असे ३-४ प्रकरणे पाहायला मिळत आहेत.’ अशी पोस्ट त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे.
कुणाल जैन यांनी ही पोस्ट परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनाही टॅग केली आहे. सोबतच त्यांनी लिहिले, तो विद्यार्थी माझ्यासोबत विमानाने येणार होता, परंतु त्याला विमानात चढू देण्यात आले नाही. असे का घडले? याचे कारण शोधून काढले पाहिजे.’
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत लोक इमिग्रेशन धोरणाविरोधात आवाज उठवत आहेत. तसेच रस्त्यावर उतरून याचा निषेध देखील करत आहेत. मात्र, तरीही अमेरिकेतील प्रशासन आपल्या कृतींपासून मागे हटत नाही.







