शिक्रापूर : चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करत तिचे लांब केस केस कापण्याच्या कात्रीने जबरदस्तीने कापल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना शिक्रापूर (ता. शिरूर) येथे गुरुवारी (ता. 12 ) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली आहे. एवढ्यावरच न थांबता पतीने त्याच कात्रीने पत्नीच्या हातावर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करून तिला जखमी केल्याचा आरोप विवाहितेने केला आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात माय-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी 26 वर्षीय विवाहितेने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे पती आकाश रायकर आणि सासू अरुणा रायकर यांच्याविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या पती, तीन मुले आणि सासू-सासरे यांच्यासह शिक्रापूर येथे राहतात. त्यांचे पती आकाश यांचे सलूनचे पाच ते सहा दुकाने असून, तेथील कामगारांवर देखरेख करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मागील तीन वर्षांपासून पती चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करत असल्याचे पीडित विवाहितेने फिर्यादीत म्हटले आहे.
फिर्यादी या नवीन कपड्यांचे फिटिंग करून गुरुवारी (ता. 12 ) सायंकाळी पाचच्या सुमारास घरी परतल्या. यावरून पतीने ‘तू बाहेर का गेली होतीस?’ असा जाब विचारत चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण केली. त्यानंतर घरातील केस कापण्याची कात्री आणून त्यांचे लांब केस जबरदस्तीने वेडेवाकडे कापले. फिर्यादी यांनी विरोध केला असता त्याच कात्रीने हातावर, डोक्यावर आणि पाठीवर मारहाण करून जखमी केले. यावेळी सासूनेही शिवीगाळ व दमदाटी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

त्यानंतर पतीने कारमधून पीडित विवाहितेला त्यांच्या माहेरी बुरुंजवाडी येथे नेऊन सोडले. तेथून आई व भावासह त्यांनी शिक्रापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार आकाश रायकर आणि सासू अरुणा रायकर यांच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 115(2),118(1),3(5),351(2),351(3),352 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







