पुणे : आगामी 1 नोव्हेंबरपासून मोबाईल युजर्ससाठी मोठा बदल होणार आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने कॉलिंग नेम प्रेझेंटेशन ही सेवा अनिवार्य केली आहे. यामुळे आता कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून फोन आल्यास, नंबरऐवजी थेट फोन करणाऱ्या व्यक्तीचे अधिकृत नाव मोबाईल स्क्रीनवर झळकणार आहे.

सध्या अनोळखी कॉल्सची माहिती घेण्यासाठी अनेक जण थर्ड पार्टी ॲप्सचा वापर करतात. मात्र, हे ॲप्स युजर्सच्या कॉन्टॅक्ट लिस्टवर अवलंबून असतात आणि कधीकधी चुकीची माहिती दाखवतात. तसेच डेटा चोरीचा धोकाही बळावतो. पण, TRAI च्या नवीन नियमांनुसार, आता सिम कार्ड घेताना दिलेल्या केवायसी माहितीच्या आधारे थेट टेलिकॉम रेकॉर्डमधील नाव स्क्रीनवर दिसणार आहे. यासाठी कोणत्याही वेगळ्या ॲपची गरज पडणार नाही आणि हे फीचर आपोआप सुरू होईल.

तसेच या सुविधेमुळे सायबर गुन्हेगार, स्पॅम कॉल्स आणि फसवणूक करणाऱ्या बोगस कॉल्सना मोठा चाप बसणार आहे. बँकिंग फ्रॉड किंवा क्रेडिट कार्डच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्या लोकांना ओळखणे सोपे होईल आणि डिजिटल सुरक्षा वाढेल. ही सेवा सुरुवातीला 4G आणि 5G नेटवर्कवर कार्यान्वित केली जाईल.

मात्र, या सुविधेचा महत्वाचा भाग म्हणजे, अनेकांनी आपल्या फोनबुकमध्ये मित्र किंवा मैत्रिणींची नावे बदलून किंवा टोपणनावाने सेव्ह केली असतात. अशा लोकांचे खरे नाव आता स्क्रीनवर दिसणार असल्यामुळे बऱ्याच जणांची पोलखोल होण्याची शक्यता आहे.






