पुणे : गेल्या काही दिवसांपासून कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावात दररोज मोठी घसरण आणि चढ-उतार होत आहे.अशातच आता व्यापाऱ्यांमधील आपापसातील वादामुळे येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे लिलाव अचानक बंद पाडण्यात आले. याचा थेट आणि मोठा फटका कांदा विक्रीसाठी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना बसला आहे . लिलाव अचानक थांबल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर मालेगाव-अहिल्यानगर राज्य महामार्गावर उतरून जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले.

कांद्याला मिळणाऱ्या बाजारभावात चढ -उतार होत असताना देखील अशा आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी आपला माल विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, येवला बाजारात व्यापाऱ्यांच्या अंतर्गत मतभेद आणि वादामुळे अनेक व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी होण्यास नकार दिला. यामुळे लिलावाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली. तासनतास वाट पाहूनही लिलाव सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा संयम सुटला आणि त्यांनी तातडीने लिलाव पूर्ववत करण्याची मागणी करत आंदोलन सुरू केले.

रस्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे खोळंबली होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन बाजार समितीचे सभापती आणि प्रशासकीय मंडळाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. तसेच लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांना कडक सूचना देत लिलाव प्रक्रिया तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले. प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर कांद्याचे लिलाव पुन्हा पूर्ववत सुरू झाले.

आधीच अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यांसारख्या संकटांशी शेतकरी सातत्याने सामना करत आहेत. अशा वेळी व्यापाऱ्यांच्या वैयक्तिक किंवा अंतर्गत वादाचा भुर्दंड शेतकऱ्यांनी का सहन करावा, असा संतप्त सवाल आता उपस्थित केला जात आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.






