नवी दिल्ली: पहिला-वहिला महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून विश्वविजेतेपद मिळवल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना, दीप्ती शर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांच्यासह संपूर्ण संघाने पंतप्रधानांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खेळाडूंनी पंतप्रधानांना टीम इंडियाची जर्सी भेट दिली.

या भेटीदरम्यान सर्व खेळाडूंनी पंतप्रधानांशी मोकळेपणाने संवाद साधला. पण झेल टिपण्यासाठी प्रसिद्ध असलेली खेळाडू हरलीन देओल हिने असा काही प्रश्न विचारला की, त्या विचारलेल्या एका प्रश्नाने उपस्थित सगळे हसायला लागले.
‘ग्लोइंग स्कीन’चे रहस्य …
हरलीन देओलने संधी मिळताच पंतप्रधानांना एक खास प्रश्न विचारला. ती म्हणाली, “सर, मला तुमचे स्कीन केअर रुटीन काय आहे, ते विचारायचे आहे. तुमची स्कीन खूप ग्लो करते.”
पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
हरलीनचा हा उत्स्फूर्त प्रश्न ऐकून तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आले. खुद्द पंतप्रधान मोदीही या प्रश्नावर हसले आणि त्यांनी मिश्किलपणे या प्रश्नाचे उत्तर दिले. ते म्हणाले की, त्वचेच्या ‘ग्लो’चे रहस्य दुसरे-तिसरे काही नसून ते ‘लोकांचे प्रेम आणि आशीर्वाद’ आहे. ते पुढे असंही म्हणाले की, त्यांना राजकारणात आणि सरकारमध्ये उच्च पदावर काम करून आता 25 वर्षे पूर्ण झाली आहेत. एवढ्या मोठ्या कार्यकाळानंतरही देशवासीयांचे इतके आशीर्वाद मिळतात, हाच त्याचा खरा परिणाम आहे.







