पुणे: मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवीन कात्रज बोगद्याजवळ झालेल्या अपघातात 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर तिच्यासोबत दुचाकीवर प्रवास करणारी मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या 18 चाकी कंटेनरला दुचाकीची मागून धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव साक्षी अमोल सावंत असून, जखमी मैत्रिणीचे नाव रेणुका बलभीम कांबळे असे आहे. अपघातानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच साक्षीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी तपासणीनंतर घोषित केले. रेणुका हिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी आणि रेणुका दुचाकीवरून मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गाने प्रवास करत होत्या. नवीन कात्रज बोगद्याजवळ रस्त्यावर एक कंटेनर उभा होता. याच वेळी त्यांच्या दुचाकीची कंटेनरला पाठीमागून धडक बसली. धडक जोरदार असल्याने दोघीही रस्त्यावर पडून गंभीर जखमी झाल्या.

अपघाताची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, साक्षीला वाचवता आले नाही.
प्राथमिक चौकशीत कंटेनर चालकाच्या कथित हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचे समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी कंटेनर चालक योगेश नागनाथ सातपुते (वय 35, रा. कौठळी, जि. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक फिरोज मुलाणी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






