पुनावळे: पुण्यातील पुनावळे परिसरात कारमध्ये ठेवलेली 50 लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, पैसे आणण्यासाठी फिर्यादीसोबत मुंबईला गेलेल्या व्यक्तीचाच या चोरीत सहभाग असल्याचे तपासात उघड झाले. या व्यक्तीने आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचा आरोप आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या 8 तासांत दोघांना ताब्यात घेतले असून चोरीला गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीने मुंबईहून 50 लाख रुपये आणले होते. पुण्यात आल्यानंतर त्याने पुनावळे येथे आपली कार उभी केली. याच दरम्यान कारमध्ये ठेवलेली रोकड चोरीला गेली. विशेष म्हणजे, कारचे कोणतेही नुकसान झालेले नव्हते किंवा गाडीची तोडफोडही करण्यात आली नव्हती. त्यामुळे ही चोरी नेमकी कशी झाली, असा प्रश्न उपस्थित झाला.

तपासादरम्यान चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून कार उघडल्याचे समोर आले. यावरून चोरी अचानक घडलेली नसून, त्यासाठी आधीच नियोजन करण्यात आले असावे, असा संशय पोलिसांना आला.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. फिर्यादीसोबत मुंबईला रोकड आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीनेच आपल्या दुसऱ्या साथीदाराच्या मदतीने चोरी केल्याचे तपासात उघड झाले. त्यामुळे या घटनेत ओळखीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास महागात पडल्याचे स्पष्ट झाले.
पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेचे युनिट 2, मालमत्ता विरोधी पथक आणि रावेत पोलिसांनी संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.






