इंदौर: मध्य प्रदेशातील इंदौरमधील एक जोडपे लग्नानंतर चार दिवसांनी हनिमूनला गेले असता बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. दरम्यान, 11 दिवसानंतर इंदूरमधील व्यावसायिकाचा मृतदेह खोल दरीत सापडला असून पत्नी अजूनही बेपत्ता आहे. राजा रघुवंशी आणि पत्नी सोनम रघुवंशी असे जोडप्याचे नाव आहे. २३ मे रोजी चेरापूंजीजवळच्या ओसारा हिल्सपासून दोघेही बेपत्ता झाले होते. शोध मोहिमेनंतर, राजा रघुवंशी यांचा मृतदेह धबधब्याच्या जवळील एका खोल दरीत सापडला आहे.

राजा रघुवंशी यांचा मृतदेह त्यांची भाड्याने घेतलेली बाईक ज्या ठिकाणी सापडली त्या ठिकाणापासून सुमारे २५ किलोमीटर अंतरावर सापडला आहे. पोलिस आता सोनम रघुवंशी यांना शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. राजा रघुवंशी यांच्या कुटुंबाने घातपाताचा संशय व्यक्त केला आहे आणि पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. सध्या मुसळधार पावसामुळे पोलिसांना बचावकार्य करण्यात अनेक अडचणी येत आहेत. कुटुंबाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.







