दौंड : पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस गावच्या हद्दीत ओम तारा रेस्टॉरंटसमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. गुरुवारी (ता. 15) संध्याकाळी अपघात झाला होता. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. 16) पहाटे तरुणाचे उपचारादरम्यान रुग्णालयात निधन झाले.

किरण सुभाष जावळे (वय -25, रा. शिंदे, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण जावळे हा 14 ऑक्टोबर रोजी पेरणे फाटा येथे आपल्या मावस भावाकडे आला होता. 15 ऑक्टोबर रोजी सकाळी त्याला मुंढवा ब्रिज, पुणे येथे सोडण्यात आले होते. त्यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास पाटस हद्दीतील ओम तारा रेस्टॉरंटसमोर पुणे-सोलापूर महामार्गावर तो जखमी अवस्थेत आढळला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर त्याच्या नातेवाइकांनी लोणी काळभोर येथील मोठ्या रुग्णालयात त्याला दाखल केले होते. यावेळी किरणच्या डोक्याला, डोळ्याला आणि उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक उपचारांनंतर त्याला पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, 16 ऑक्टोबर रोजी पहाटे साडे तीन वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती नातेवाइकांना मिळाली. त्यानंतर मृताच्या नातेवाइकांनी पाटस येथे जाऊन अपघाताची चौकशी केली आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कदम करीत आहेत.






