पुणे : पुण्यात पीएमपी चालकांच्या निष्काळजीपणामुळे होणाऱ्या अपघातांचे सत्र सुरूच आहे. हडपसर येथील गाडीतळ बसस्थानकाच्या आवारात घडलेल्या एका भीषण अपघातात 79 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. कमलाबाई दादू लोंढे (वय 79, रा. कॅम्प) असे या अपघातात प्राण गमावलेल्या महिलेचे नाव आहे. गुरुवारी घडलेल्या या घटनेमुळे पीएमपी प्रशासनाचा कारभार आणि चालकांच्या बेफिकिरीवर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कमलाबाई लोंढे या हडपसर बसस्थानकात उभ्या होत्या. त्याचवेळी हिंजवडीहून भेकराईनगरकडे जाणारी भरधाव पीएमपी बस स्थानकात आली. बसचालकाच्या बेजबाबदारपणामुळे बसने कमलाबाईंना जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरात होती की, त्या थेट बसखाली आल्या आणि गंभीररीत्या चिरडल्या गेल्या.
हा प्रकार पाहुन स्थानकातील उपस्थितांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी मोठ्या धडपडीने त्यांना बसखालून बाहेर काढले आणि उपचारासाठी ससून रुग्णालयात हलवले. मात्र, गंभीर दुखापत झाल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी हडपसर पोलिसांनी बसचालक तुषार देविदास कामठे याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी दिली. पीएमपी चालकांच्या बेशिस्त आणि धोकादायक ड्रायव्हिंगमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याने, प्रशासनाने अशा चालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.







