न्हावरे : रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची वाटचाल खाजगीकरणाकडे होणार नाही, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांनी केले.

न्हावरे(ता.शिरूर)येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (ता.19) परिसरातील कन्यादान मंगल कार्यालयात कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार यांच्या अध्यक्षतेखाली काही सत्ताविरोधी सभासदांनी घातलेल्या गोंधळामुळे गोंधळात पार पडली.

पुढे बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ऋषिराज पवार म्हणाले की, घोडगंगा कारखाना सहकाराच्याच माध्यमातून सुरू होईल.त्यासाठी संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू असून,वरिष्ठ पातळीवरील सर्वपक्षीय नेत्यांची घोडगंगा कारखान्याला आर्थिक सहकार्य करण्याची भावना आहे,असेही ऋषिराज पवार यांनी सांगितले. यावेळी ऋषिराज पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,एकनाथ शिंदे, मुरलीधर मोहोळ,बाबासाहेब पाटील आणि सुप्रिया सुळे यांचे विशेष आभार मानले.तसेच विरोधी गटाच्या मोजक्याच तीन-चार जणांनी घातलेल्या गोंधळामुळे सभा आटोपती घ्यावी लागली. असा आरोपही कारखान्याचे अध्यक्ष ऋषीराज पवार यांनी केला आहे.

सभेच्या सुरुवातीला काही सभासदांनी कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट भुजबळ हे प्रास्ताविक करत असतानाच अचानक गोंधळ घातला.त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.मात्र,त्यानंतर कारखान्याचे माजी अध्यक्ष व माजी आमदार ॲड.अशोक पवार,कारखान्याचे संचालक व माजी उपाध्यक्ष दादापाटील फराटे,विश्वास ढमढेरे, महेश ढमढेरे यांनी मध्यस्थी केल्यानंतर काही वेळाने सभा पुन्हा सुरू झाली.
त्यानंतर विषय पत्रिकेचे वाचन कारखान्याचे प्रभारी कार्यकारी संचालक विकास पाटील यांनी केले.याप्रसंगी विषय पत्रिकेचे विषयानुसार वाचन सुरू असताना सुधीर फराटे,काकासाहेब खळदकर,सुरेश पालांडे,किशोर फराटे,तात्या शेलार यांनी चर्चेमध्ये सहभाग घेतला.दरम्यान काही सभासदांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यामुळे सभा कोणत्याही निर्णयाविना राष्ट्रगीताने आटोपती घ्यावी लागली.
यावेळी कारखान्याचे संचालक, सभासद व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.याप्रसंगी उपस्थितांचे स्वागत मंगेश ढवळे यांनी केले.तसेच सभास्थळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कारखाना सत्ताविरोधी गटाकडून निषेध सभा….
दरम्यान घोडगंगेची वार्षिक सर्वसाधारण सभा आटोपल्यानंतर कारखान्याच्या सत्ताविरोधी गटाने नियोजित सभास्थळाबाहेर निषेध सभेचे आयोजन केले होते.यावेळी दादापाटील फराटे,बाबासाहेब फराटे,आबासाहेब गव्हाणे, काकासाहेब खळदकर,शशिकांत दसगुडे,सुधीर फराटे,राजेंद्र जासूद,श्रीनिवास घाडगे, बाळासाहेब घाडगे,सचिन मचाले,बबन वाळके,तात्या शेलार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक उपस्थितांनी निषेध व्यक्त केला






