पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. छत्तीसगडवरून महाराष्ट्रात येणारा तब्बल ३ कोटी ३ लाख ९६ हजार रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केलाय. या आंतरराज्यीय रॅकेटमधील ७ मुख्य आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बारामती आणि सांगली परिसरात फिल्मी स्टाईलने दोन इनोव्हा कारचा पाठलाग करून पोलिसांनी हा गेम उलटवला. हे तस्कर ओडिसा आणि छत्तीसगडमधून गांजा स्वस्तात खरेदी करायचे. त्यानंतर तो माल सोलापूर, सांगली, सातारा आणि पुणे जिल्ह्यातील स्थानिक पेडलर्सना महागड्या दराने विकायचे.

६३४ किलो गांजा जप्त; असा रचला सापळा!
काही दिवसांपूर्वी बारामतीतील जळोची रोडवर एका शेतात ४७८ किलो गांजा सापडला होता. तेव्हापासून स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि बारामती पोलीस या रॅकेटच्या मुळाशी पोहोचण्यासाठी टपून बसले होते. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या जाळ्याचा वापर करून मुख्य आरोपींचा माग काढला.

मिळालेल्या पक्क्या माहितीनुसार, मुख्य सूत्रधार विकी कांबळे आणि त्याचे साथीदार दोन इनोव्हा गाड्यांमधून पंढरपूर-फलटण मार्गे बारामतीकडे येत होते. पोलिसांनी तात्काळ दोन पथके तयार करून गाडीचा पाठलाग सुरु केला.
पोलिसांना पाहताच तस्करांनी गाड्या पळवल्या. एक इनोव्हा कार तासगावच्या दिशेने वेगात सुटली. पुणे ग्रामीण पोलिसांनी तातडीने सांगली पोलिसांना अलर्ट पाठवला. सांगली एलसीबीने विटा येथे या गाडीला घेरले आणि गाडीतून १३४ किलो गांजा जप्त केला.
दुसरीकडे, बारामतीच्या सुपे फलटण रोडवरील गव्हाणे चौकात पोलिसांनी दुसऱ्या संशयित इनोव्हा कारची नाकेबंदी करून २३ किलो गांजा जप्त केला. दरम्यान, या प्रकरणी एकूण कारवाईत पोलिसांनी ६३४ किलो ओला गांजा जप्त करून तस्करांचे कंबरडे मोडले आहे.
याप्रकरणी १. प्रकाश उर्फ पक्या मोहन काटे (वय २९, बारामती) २. समाधान धर्मराज गायकवाड (वय २३, बारामती, मूळ- धाराशिव) ३. प्रिन्सकुमार मुन्ना सिंग (वय २२, बिहार) ४. राहुल कल्याण गोरे (वय २७, बीड) ५. हुसेन सुखदेव लफकरे (वय ३५, कोथरूड, पुणे) ६. आदित्य विकास शिंदे (वय २०, कोथरूड, पुणे) ७. युवराज ज्ञानेश्वर दुर्गे (रा. सुतारदरा, कोथरूड, मूळ- मुळशी) यांना अटक केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्यासह सो. पुणे ग्रामीण, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गणेश बिरादार, बारामती विभाग, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुदर्शन राठोड, बारामती उपविभाग, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, बारामती शहर पोस्टे चे पोनि श्रीशैल्य चिवडशेट्टी, स्था.गु.शा.चे सपोनि कुलदीप संकपाळ, ग्रेड पोसई बाळासाहेब कारंडे, पोलीस अंमलदार अभिजीत एकशिंगे, ज्ञानेश्वर क्षिरसागर, स्वप्निल अहीवळे, निलेश शिंदे, अजय घुले, बारामती शहर पो स्टे कडील पोसई रत्नदिप भंडारे, पोलीस अंमलदार रामचंद्र शिंदे, सुलतान डांगे, अमोल शिंदे, उत्तम खाडे, यशवंत पवार, गिरीश नेवसे, अमोल देवकाते, अक्षय सिताप, विशाले शिंदे, सागर जामदार, बनसोडे, झणझणे यांनी केली आहे.







