पुणे : पालघर जिल्ह्यातील विरार येथील प्रसिद्ध अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर आज एक अतिशय दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली. सकाळी खेळत असताना अचानक आलेल्या पाण्याच्या वेगामुळे 4 मुले समुद्रात वाहून गेली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही चारही मुले समुद्राच्या पाण्याच्या जवळ खेळण्यात दंग होती. मात्र, पावसाळ्याचे दिवस असल्याने समुद्राला आलेल्या उधाणामुळे आणि मोठ्या लाटांच्या तडाख्यामुळे ती चारही मुले पाण्यात खेचली गेली. मुलांना बुडताना पाहून किनाऱ्यावरील स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली.

स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या प्रयत्नांमुळे 4 पैकी 2 मुलांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे. वेळेवर वैद्यकीय उपचार मिळाल्यामुळे या दोन्ही मुलांची प्रकृती आता धोक्याबाहेर आणि स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
अपघाताचा बळी ठरलेली ही मुले नालासोपारा परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मात्र, उर्वरित 2 मुले अद्यापही बेपत्ता असून त्यांचा शोध लागलेला नाही. घटनेची माहिती मिळताच अर्नाळा सागरी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि जीवरक्षकांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी समुद्रात बोटींच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबवले जात असून, किनारपट्टीच्या भागातही कसून तपास सुरू आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना कडक इशारा दिला आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो आणि भरतीच्या वेळी समुद्रात उतरणे अत्यंत जीवघेणे ठरू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेचे नियम पाळावेत आणि पाण्यात उतरण्याचे धाडस करू नये, असे आवाहन वारंवार केले जात आहे.







