लोणी काळभोर : वडील आणि मुलीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी घटना लोणी काळभोर परिसरात उघडकीस आली आहे. जन्मदात्या वडिलांनीच आपल्या अल्पवयीन मुलीशी लगट करून तिचा विनयभंग केल्याचा तसेच बाललैंगिक अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी 35 वर्षीय आरोपी वडिलाला तत्काळ अटक केली आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 74 तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आपल्या पोटच्या मुलीशी लगट करीत होता. त्यामुळे मुलीला लज्जा उत्पन्न झाली. घडलेला प्रकार तिने आईला सांगितल्यानंतर आईने तत्काळ लोणी काळभोर पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) नंदकुमार कोळी यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सतीश गोडसे यांच्यासह पथकाला आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिल्या.
त्यानंतर पोलीस हवालदार अण्णा माने, सूरज कुंभार आणि पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांच्या पथकाने कारवाई करीत आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करीत आहेत.






