सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील दहिटणे गावामध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते, त्यातच मुलांच्या शिक्षणाचा वाढता खर्च यामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले.

बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लक्ष्मण काशिनाथ गावसाने असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मंगळवारी दुपारी लक्ष्मण गवसाने घराबाहेर पडले मात्र उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत. त्यानंतर कुटुंबीयांनी वैराग पोलीस ठाण्यात ते बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.

लक्ष्मण गावसाने यांचा शोध घेत असताना पोलिसांना त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आणि गावसाने यांचा मृतदेह झाडावरून खाली काढत मृतदेहाची तपासणी करत असताना पोलिसांना त्यांच्या खिशामध्ये एक चिठ्ठी सापडली. यामध्ये त्यांनी आमदार-खासदारांनी कुटुंबाला आर्थिक मदत करावी आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी, अशी कळकळीची विनंती केली आहे.

लक्ष्मण गवसाने यांची मुलगी सोलापूर जिल्ह्याबाहेर बीएससीचे शिक्षण घेत असून, मुलगाही इंजिनीअरिंग करत आहे. त्यांच्या दीड एकर कोरडवाहू शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतातील पिके कुजून गेली. यामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीमुळे ते मानसिक तणावाखाली होते. दरम्यान, त्यांच्या भावाने नैसर्गिक आपत्तीला कंटाळून आपल्या भावाने आत्महत्या केल्याचे सांगितले.
दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर गवसाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, मुलगी आणि दोन भाऊ असा परिवार आहे. नैसर्गिक आपत्तीने पिचलेल्या एका तरुण शेतकऱ्याने उचललेल्या या टोकाच्या पावलामुळे सोलापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.







