Exam Paper Leak : परीक्षा सुरक्षेबाबत कडक उपाययोजनांचे दावे केले जात असतानाच नागपूर येथे रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेची गळती झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सेंट उर्सुला हायस्कूल या परीक्षा केंद्रावर सतर्क पर्यवेक्षकामुळे हा प्रकार समोर आला; अन्यथा तो सहज दडपला गेला असता.

बुधवारी पेपर सुरू असताना एका विद्यार्थिनीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने शिक्षिकेने तिची तपासणी केली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याचे दिसत होते. तपासणीदरम्यान तिच्याकडून स्मार्टफोन जप्त करण्यात आला. मोबाईलमध्ये परीक्षा सुरू होण्यापूर्वीच एका व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रश्नपत्रिका शेअर झाल्याचे आणि संभाव्य उत्तरांवर चर्चा झाल्याचे आढळले. केंद्रप्रमुखांनी तात्काळ पोलिसांना कळविले. विद्यार्थिनीच्या जबाबावरून आणखी एका विद्यार्थिनीची चौकशी सुरू आहे.
प्राथमिक तपासात एका खाजगी शिकवणीशी संबंधित व्यक्तीने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी मोबाईल डेटा, ग्रुपमधील संदेश आणि कॉल रेकॉर्ड्सचा तांत्रिक तपास सुरू केला आहे. ही गळती केवळ एका केंद्रापुरती मर्यादित नसून राज्यातील इतर भागांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली का, याचाही शोध घेतला जात आहे.
या घटनेमुळे परीक्षा प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाखो विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून परीक्षेला बसतात; अशा गळतीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. तज्ज्ञांच्या मते, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक आणि डिजिटल संप्रेषण या सर्व टप्प्यांवर अधिक कडक तांत्रिक नियंत्रण आवश्यक आहे. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर अशा घटना पुन्हा घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे.







