प्रतिनिधी अमित मुंडीक
Pune News : पुणे शहर वाहतूक पोलिसांनी २० फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण शहरात मॉडिफाईड सायलेन्सर असलेल्या बुलेट मोटरसायकलींविरोधात विशेष मोहीम राबवली. या कारवाईत एकूण ३४८ बुलेट वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सर्व संबंधित वाहनांचे मॉडिफाईड सायलेन्सर तात्काळ काढून जप्त करण्यात आले. या मोहिमेदरम्यान ₹३,३४,००० इतका दंड शासनाकडे जमा करण्यात आला असून ३४८ मॉडिफाईड सायलेन्सर आणि १४८ वाहने जप्त करण्यात आली.

याशिवाय, इतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. विविध नियमभंगाच्या प्रकरणांतून तब्बल ₹१५,७३,८०० इतका दंड वसूल करण्यात आला. वाहतूक विभागाने नागरिकांना ध्वनीप्रदूषण टाळण्यासाठी आणि शांततामय वाहतूक व्यवस्था राखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ विशेष मोहिमेअंतर्गत दाखल प्रकरणांची सुनावणी मोटार वाहन न्यायालय, शिवाजीनगर येथे पार पडली. एकूण ५३ आरोपींविरुद्ध खटले दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४४ आरोपींना न्यायालयाने ₹४,२९,५०० इतका दंड ठोठावला असून तो तत्काळ वसूल करण्यात आला. मद्यपान करून वाहन चालविणे हा गंभीर आणि दंडनीय गुन्हा असल्याचे सांगत वाहतूक शाखेने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे.







