अमित मुंडीक

पुणे: पुणे रेल्वे स्थानक परिसरातून चार वर्षांच्या (Pune Crime) चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना १७ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडकीस आली. या प्रकरणी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ( Latest Marathi News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुटुंब मध्यप्रदेशातील खंडवा येथील रहिवासी असून ते रेल्वेने पुण्यात आले होते. पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास फलाट क्रमांक ३ वर कुटुंबीय विश्रांती घेत असताना बालिका बेपत्ता झाल्याचे लक्षात आले. तक्रार मिळताच पोलिसांनी स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता एक इसम बालिकेला हाताला धरून नेत असल्याचे स्पष्ट दिसून आले. आरोपी हा रेल्वे प्रवाशांचे सामान उतरवण्यास मदत करणारा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले.
शोधमोहीम राबवून आरोपीला रेल्वे परिसरातून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने खाऊचे आमिष दाखवून बालिकेला नेल्याचे उघड झाले. बालिकेवर अत्याचार झाल्याचे समोर आले असून तिला तातडीने वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत अपहरण व लैंगिक अत्याचाराचे कलम लावून गुन्हा नोंदविण्यात आला असून न्यायालयाने आरोपीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.







