पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरातील भरतवाडी (पिंपरी-सांडस) येथून एक अतिशय हृदयद्रावक घटना समोर आली आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून अवघ्या 21 वर्षीय विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हिना असिफ पटेल असे मृत तरुणीचे नाव असून, या प्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिना आणि आसिफ यांचा निकाह 30 मे 2024 रोजी झाला होता. लग्नानंतर काही महिने सर्व काही ठीक चालले होते; परंतु त्यानंतर सासरच्या मंडळींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यास सुरुवात केली. माहेरहून पैशांची मागणी पूर्ण करण्यासाठी तिच्यावर सतत दबाव टाकला जात होता. या न संपणाऱ्या त्रासामुळे हिना पूर्णपणे खचली होती. अखेर सासरच्या सततच्या तगाद्याला आणि अपमानाला कंटाळून तिने 17 ऑक्टोबरला टोकाचे पाऊल उचलले.

या दुर्दैवी घटनेनंतर हिनाची आई शमीम मुसा शेख यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत पती आसिफ मशाक पटेल (वय २५), सासू साहेरा बेगम मशाक पटेल (वय ४२) आणि दीर सिदीप मशाक पटेल (वय २३) यांना अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक विलास मोटे करत आहेत.

लग्नानंतर अवघ्या काही महिन्यांतच एका तरुण मुलीचा असा अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, हुंड्यासाठी होणाऱ्या अत्याचाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.






