पुणे :महाराष्ट्र राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधव मोठ्या संकटात सापडले आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी सण कसा साजरा करायचा, हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला होता. मात्र, राज्य सरकारने शेतकरी बांधवांना मोठा दिलासा देत आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. दुष्काळ निवारणासाठी प्रत्येकी 5000 रुपयांची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला असून, त्यानुसार बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले की, राज्यातील सुमारे 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5000 रुपये जमा करण्यात आले आहेत. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरही आज-उद्या ही मदत पोहोचेल. यासोबतच कर्जमाफीच्या रक्कमेचे वाटपही वेगाने सुरू आहे. विशेषतः मराठवाड्यातील 2,76,000 हून अधिक शेतकरी कुटुंबांना या कर्जमाफीचा थेट लाभ मिळाला असून, मराठवाड्याला या योजनेत सर्वाधिक फायदा झाला आहे.
दुसरीकडे, ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’अंतर्गत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या योजनेद्वारे आज 4 लाख 86 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 4764 कोटी रुपये थेट हस्तांतरित करण्यात आले. यामध्ये मराठवाड्यातील शेतकरी मोठ्या संख्येने समाविष्ट आहेत. आतापर्यंत या योजनेतून एकूण 20 लाख 72 हजार शेतकऱ्यांना 18,042 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.

शेतकरी संकटात असताना त्यांना नैतिक आणि सामाजिक पाठबळ देण्यासाठी महायुती सरकारचे सर्व मंत्री यंदा शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दिवाळी साजरी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना तसे निर्देश दिले आहेत. तसेच, शेतीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी 7 TMC पाणी उपलब्ध करून दिले असून जल प्रकल्पांची कामेही जलद गतीने पूर्ण केली जात आहेत.

या दुष्काळग्रस्त परिस्थितीत मदत म्हणून राज्याचे मंत्री अतुल सावे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी आपल्या व्यक्तिगत स्तरावरून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. या सामाजिक बांधिलकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री अतुल सावे यांचे विशेष आभार मानले आहेत.







