Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 4 : लोणी काळभोर (ता. हवेली) परिसरात आज सोमवारी (ता.4) दुपारच्या सुमारास सलग दोन ठिकाणी आग लागल्याने एकच खळबळ उडाली. पुणे–दौंड रेल्वेमार्गालगत रुळांच्या दोन्ही बाजूंना लागलेली आग आणि त्याचवेळी राजेंद्र पेट्रोल पंपाच्या मागील भागात भडकलेली दुसरी आग यामुळे मोठ्या दुर्घटनेची भीती निर्माण झाली होती. मात्र स्थानिक नागरिक आणि माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांच्या वेळीच केलेल्या धाडसी प्रयत्नांमुळे संभाव्य अनर्थ टळला. Loni Kalbhor

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी कंपनीजवळील लडकत वस्ती परिसरात घडली. दुपारच्या सुमारास रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूंना अचानक आग लागल्याने काही क्षणांतच ज्वाळांनी उग्र रूप धारण केले. उन्हाळ्याचे कोरडे वातावरण आणि वाऱ्यामुळे आग वेगाने पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. Loni Kalbhor
घटनेची माहिती मिळताच माजी उपसरपंच राजेंद्र काळभोर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रसंगावधान राखत रेल्वे प्रशासन आणि रामा कृषी कंपनीला तत्काळ माहिती दिली. त्यानंतर ओमकार लडकत आणि इतर स्थानिकांच्या मदतीने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. Loni Kalbhor
दरम्यान, रेल्वे पोलीस, रामा कृषीचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. त्याचवेळी राजेंद्र पेट्रोल पंपाच्या मागील भागात लागलेली आग पंपावरील कर्मचाऱ्यांनी वेळीच विझवल्यामुळे मोठा स्फोट किंवा जीवितहानी टळली.
या दुहेरी आगीमुळे काही काळ परिसरात गोंधळाचे वातावरण होते. रेल्वे वाहतुकीवरही संभाव्य परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे परिस्थिती नियंत्रणात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून मोठे नुकसान टळले आहे. स्थानिकांच्या धाडसाचे आणि राजेंद्र काळभोर यांच्या तत्परतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. Loni Kalbhor






