चिपळूण : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे एका धक्कादायक हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. शहरातील रावतळे परिसरात राहणाऱ्या सेवानिवृत्त शिक्षिका वर्षा जोशी (वय 63) यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी विवस्त्र अवस्थेत आढळून आला. मृतदेहाचे हातपाय बांधलेले होते आणि शरीरावर जखमांचे अनेक व्रण आढळले. विशेष म्हणजे, घरातील CCTV कॅमेऱ्याची हार्ड डिस्क (डीव्हीआर) देखील गायब आहे. यावरून मारेकऱ्यांनी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय पोलिसांना आहे.

ही घटना काल रात्री किंवा आज सकाळी झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. वर्षा जोशी यांच्या घरातून कोणतीही हालचाल न झाल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचताच वर्षा जोशी यांचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत, हातपाय बांधलेल्या स्थितीत आणि शरीरावर अनेक जखमा असलेला आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी चिपळूणच्या सरकारी रुग्णालयात पाठवला आहे.
या घटनेबाबत पोलीस तपास करत असताना तपासादरम्यान घरातील CCTV कॅमेरे तपासले, परंतु त्याची हार्ड डिस्क गायब असल्याचं आढळून आलं. यामुळे मारेकऱ्यांनी हत्येनंतर पुरावे नष्ट करण्याचा कट रचला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
चिपळूण पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला आणि तपास सुरू केला. श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने पुरावे गोळा केले जात आहेत. पोलिसांनी परिसरातील इतर CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे, तसेच शेजाऱ्यांचे आणि नातेवाइकांचे जबाब नोंदवले जात आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, वर्षा जोशी या एकट्याच राहत होत्या आणि त्यांनी शिक्षक म्हणून दीर्घकाळ सेवा दिली होती. त्यांच्या घरात यापूर्वी कोणतीही संशयास्पद घटना घडली नव्हती. चिपळूणमधील शांत परिसरात अशी क्रूर हत्या घडल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. यापूर्वीही चिपळूणमध्ये काही गुन्हेगारी घटना घडल्या आहेत, परंतु अशा क्रूर हत्येची ही पहिलीच घटना आहे.
पोलिसांना अद्याप हत्येमागील नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. प्राथमिक तपासात चोरी किंवा वैयक्तिक वैमनस्य यामुळे हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वर्षा जोशी यांच्या घरातून काही मौल्यवान वस्तू गायब असल्याचंही समोर आलं आहे, परंतु याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.







