Bhigvan News : भिगवण, (पुणे) : भिगवण शहरात सुरू असलेल्या रस्ते विकासकामांनी नागरिकांच्या आयुष्यात विकासाऐवजी त्रासाची भर टाकली आहे. शहरातील विविध भागांत रस्ते खोदून कामे अर्धवट अवस्थेत सोडण्यात आल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अक्षरशः विस्कळीत झाले आहे. जागोजागी पडलेले खड्डे, उडणारी धूळ, वाहतुकीची गैरसोय आणि वाढता अपघातांचा धोका यामुळे नागरिक संतप्त झाले असून ग्रामपंचायत, संबंधित विभाग आणि ठेकेदारांच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. Bhigvan News :

भिगवण येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील तुळजाभवानी मंदिराजवळील रस्ता नवीन करण्याच्या नावाखाली तब्बल पाच महिन्यांपूर्वी खोदण्यात आला. मात्र आजपर्यंत काम पूर्ण झाले नसल्याने नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून धुळीच्या प्रचंड त्रासामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना सर्वाधिक फटका बसत आहे. Bhigvan News :

याचप्रमाणे वॉर्ड क्रमांक ४ मधील थोरात नगर परिसरातही नवीन रस्त्याच्या कामासाठी मुख्य रहदारीचा रस्ता खोदण्यात आला आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून सुमारे तीन फुटांहून अधिक खोल खड्डे करून काम अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. त्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामपंचायतीकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. Bhigvan News :

आधीच खराब अवस्थेत असलेल्या रस्त्यांवर या खोदकामामुळे अधिकच भर पडली आहे. पावसाळा तोंडावर असताना या भागात पाणी साचून संपूर्ण रस्ता जलमय होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, ठेकेदाराकडून कोणत्याही प्रकारच्या सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. खोदकामाच्या ठिकाणी सूचना फलक नाही, सुरक्षेसाठी बॅरिकेडिंग नाही, त्यामुळे अपघाताचा धोका आणखी वाढला आहे. Bhigvan News :
काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे या खोदकामाच्या ठिकाणी नागरिक आणि वाहनचालक घसरल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र तरीही प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांकडून कोणतीही ठोस कारवाई किंवा दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे. गावपुढारी, अधिकारी आणि ठेकेदार यांच्या अभद्र युतीमुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची चर्चा शहरात जोर धरू लागली आहे. Bhigvan News :
दरम्यान, या संदर्भात ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय परदेशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही. Bhigvan News :
“निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विकासाचा दिखावा”
“जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निधी उपलब्ध नसतानाही रस्त्यांची कामे सुरू करण्यात आली. नागरिकांना विकासाचे गाजर दाखवत दिशाभूल करण्याचा प्रकार सुरू आहे. ग्रामपंचायत पदाधिकारी राजकारण आणि बनवाबनवी करण्यात व्यस्त असून दिशाहीन कारभारामुळे विकासकामांना मरगळ आली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुका जवळ आल्यावर पुन्हा विकासाचा दिखावा केला जाईल. केवळ दिखाऊपणासाठी रस्ते खोदून नागरिकांना वेठीस धरले जात आहे,” अशी घणाघाती टीका आप्पासाहेब गायकवाड यांनी केली. Bhigvan News :






