पुणे : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) उरळी कांचन परिसरात मोठी कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर शस्त्रसाठ्यासह अटक केली आहे. भाऊसो उर्फ भावड्या भगवान महाडिक (वय 34, सध्या रा. खुडे वस्ती, डाळिंब रोड, ता. दौंड; मूळ रा. शिंदवणे, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 27ऑगस्ट 2026 रोजी उरळी कांचन पोलिसांच्या हद्दीत सदानंद बेकरीच्या जवळ एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्टल बाळगून थांबल्याची माहिती एटीएसचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक निलेश कदम आणि महेश गायकवाड यांना खबऱ्याकडून मिळाली. माहिती मिळताच पथकाने सदानंद बेकरी परिसरात सापळा रचून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या भावड्या महाडिक याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 51,200रुपये किमतीची एक गावठी पिस्टल, 2 जिवंत काडतुसे आणि 2 कोयते जप्त करण्यात आले.

शस्त्रांचा हा साठा विनापरवाना असल्याने आरोपीविरुद्ध उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम 3,4,25 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीने ही हत्यारे कशासाठी आणली होती, याचा तपास पोलीस उपनिरीक्षक तारडे करत आहेत. भावड्या महाडिक हा पोलीस दलाच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी यवत पोलीस ठाण्यात 5 साथीदारांसह गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण व गंभीर दुखापत केल्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल असून, त्याचे प्रकरण दौंड न्यायालयात सुरू आहे.

त्याचा साथीदार शुभम उर्फ लल्या लोंढे याच्यावर उरळी कांचन येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या खुनाचा गंभीर गुन्हा नोंद आहे. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उरुळी कांचनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, महेश गायकवाड, निलेश कदम, रवींद्र जाधव, मोसीन शेख, ओंकार शिंदे व जालिंदर मुळीक यांच्या पथकाने केली.
समाजात दहशत पसरवणाऱ्या आणि अवैध शस्त्रे व अमली पदार्थ बाळगणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षक गिल्ल यांनी दिला आहे.






