पुणे: पुण्यात एका बारमध्ये अवघ्या १० रुपयांच्या वादातून एका तरुणावर अमानुष मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना वडगाव येथील नवले पुलाजवळील चैतन्य बारमध्ये ८ जुलै रोजी मध्यरात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. यामध्ये बारमधील कामगारांनी एका तरुणाच्या डोक्यात थेट बिअरची बाटली फोडली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, संबंधित तरुणाने सिंहगड रस्ता पोलिसांकडे आता तक्रार दाखल केली आहे.

तुषार यशवंत सुतार (वय २७, रा. मारणे हाइट्स, कुटे मळा, मनाजीनगर, नर्हे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते त्या रात्री चैतन्य बारमध्ये दारू पिण्यास गेले होते. दारू पिऊन झाल्यानंतर त्यांनी जेवणही घेतलं. त्यानंतर मध्यरात्री बिल भरण्यासाठी गेले असता, बिलाचे फक्त १० रुपये कमी दिल्याच्या कारणावरून वाद झाला. या किरकोळ कारणावरून बारमधील काउंटरवर असलेल्या कामगारांमध्ये संताप उसळला आणि त्यांनी तुषार यांना हाताने मारहाण केली.
याच मारहाणीत बारमधील एका कर्मचाऱ्याने तुषार यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडली. त्यामुळे तुषार गंभीर जखमी झाले. या धक्कादायक प्रकारानंतर ते थेट गावाला निघून गेले होते. पण, हल्ल्याचा व्हिडिओ बारमध्येच उपस्थित असलेल्या कोणीतरी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला. तो व्हिडिओ तुषार यांच्यापर्यंत पोहोचला आणि त्यांनी परत पुण्यात येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार गिरी गोसावी या प्रकरणाचा तपास करत आहेत. अवघ्या १० रुपयांवरून झालेल्या या गंभीर घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशा घटना बार आणि रेस्टॉरंटमध्ये होणाऱ्या सुरक्षेच्या त्रुटींचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आणत आहेत.







