सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे सुरुवातीचे निकाल समोर आले असून अनेक महत्त्वाच्या लढतींमध्ये दिग्गजांनी बाजी मारली आहे.पाटण तालुका सोसायटी मतदारसंघातून राज्याचे पर्यटन मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार सत्यजितसिंह पाटणकर यांचा 12 मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना 58 मते तर सत्यजितसिंह पाटणकर यांना 46 मते मिळाली. या विजयामुळे तब्बल 42 वर्षांनंतर दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या कुटुंबातील व्यक्तीने जिल्हा बँकेत प्रवेश केला आहे. देसाई यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी साताऱ्यात जल्लोष साजरा केला.

जावळी तालुका सोसायटी मतदारसंघ: या ठिकाणी विद्यमान संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी 38 मते मिळवून दुसऱ्यांदा बाजी मारली. त्यांचे विरोधी उमेदवार विठ्ठल गोळे यांना फक्त 8 मतांवर समाधान मानावे लागले. या मतदारसंघात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी रांजणे यांच्यासाठी विशेष प्रयत्न केले होते.
खंडाळा सोसायटी मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे अजय भोसले 28 मते मिळवून विजयी झाले. त्यांनी भाजपचे संजीव गाढवे (21 मते) यांचा पराभव केला.

महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघ: राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली राजपुरे यांनी 8 मते मिळवत शिवसेनेच्या संजय मोरे (4 मते) यांचा पराभव केला. रुपाली राजपुरे आणि अजय भोसले हे दोन्ही विजयी उमेदवार मंत्री मकरंद पाटील यांचे खंदे समर्थक मानले जातात.

निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच प्रमुख नेत्यांनी मतदारांना सुरक्षित ठिकाणी ठेवून जोरदार मोर्चेबांधणी केली होती. शेवटी मतदानाच्या दिवशी थेट केंद्रावर आणून मतदान पार पडले, ज्याचे निकाल आता स्पष्ट झाले आहेत.







