पुणे : खाटू श्यामजींचे दर्शन घेऊन आपल्या गावी महाराष्ट्राकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर राजस्थानमध्ये मोठा काळाचा घाला पडला आहे. कोटा-उदयपूर राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री झालेल्या एका भयंकर रस्ते अपघातात लहान मुलांसह एकाच कुटुंबातील 9 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर इतर 6 प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

रविवारी रात्री साधारण 1 वाजण्याच्या सुमारास नाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभूपुरा गावाजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, या कुटुंबातील एकूण 16 सदस्य एका क्रूझर वाहनातून प्रवास करत होते. महामार्गावरून जात असताना या भरधाव क्रूझरने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की,गाडीचा चुराडा झाला आणि 9 प्रवाशांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकताच आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि अडकलेल्या जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
या दुर्घटनेबाबत कोटाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेश जोशी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. अपघातातील सर्व मृत आणि जखमी व्यक्ती एकाच परिवारातील असून ते महाराष्ट्राचे रहिवासी आहेत. या अपघातात उषा बाई, सुशीला, कैलाश, सान्वी, सज्जन, अनिता, जान्हवी, बाबूलाल आणि माधवी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, गंभीर जखमी असलेल्या 6 जणांवर सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

या अपघातातून थोडक्यात बचावलेल्या एका तरुणाने या घटनेचा थरार सांगितला. या कुटुंबाच्या एकूण 5 गाड्या एकत्र प्रवास करत होत्या. खाटू श्यामजी येथून दर्शन आटोपून ते धारच्या दिशेने निघाले होते. प्रवासादरम्यान त्यांच्यातील 3 गाड्या पुढे निघून गेल्या, तर 2 गाड्या मागे राहिल्या होत्या. काही वेळातच पुढे असलेल्या एका महिलेचा फोन आला आणि अपघात झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली, ज्यानंतर मागे असलेल्या सर्वांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






