पुणे : महाराष्ट्रातील दुष्काळी भागाला दिलासा देण्यासाठी जलसंपदा विभागाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतून वाहणाऱ्या कृष्णा नदीतील अतिरिक्त आणि समुद्राला मिळणारे पाणी आता नीरा नदीत वळवले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या सविस्तर सर्वेक्षणासाठी आणि अहवाल (DPR) तयार करण्यासाठी शासनाने 24 कोटी 5 लाख 67 हजार 125 रुपये निधीच्या प्रशासकीय मान्यतेचा आदेश जारी केला आहे.

हा पाणी वळवण्याचा प्रकल्प प्रामुख्याने दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे.

पहिला टप्पा: कृष्णा नदीवरील सापटेवाडी बंधाऱ्यातून पाणी उचलून ते नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यात आणले जाईल.
दुसरा टप्पा: उद्धट बंधाऱ्यातील हे पाणी पुढे थेट सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणात सोडण्यात येईल.
जलसंपदा विभागाकडून मंजूर करण्यात आलेल्या 24.05 कोटी रुपयांच्या एकूण खर्चाची विभागणी पुढीलप्रमाणे असणार आहे. त्यानुसार सर्वेक्षण आणि आराखडा तयार करणे: 19 कोटी 40 लाख 5 हजार 747 रुपये, आकस्मिक खर्च: 58 लाख 20 हजार 172 रुपये, यंत्रसामग्री आणि स्थापना खर्च: 38 लाख 80 हजार 115 रुपये
कृष्णा पाणी तंटा लवाद-1 (KWDT-I) नुसार महाराष्ट्राला 585 TMC पाणी मिळाले आहे. मात्र, या पाण्याचा अद्याप पूर्ण वापर झालेला नाही. लवाद-2 च्या निकालाची अधिकृत अधिसूचना अद्याप बाकी असल्याने, लवाद-1 च्या चौकटीत राहूनच ही कार्यवाही केली जात आहे.
आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या ‘महाराष्ट्र प्रज्ञाक्षम विकास कार्यक्रमांतर्गत’ या योजनेचा पूर्व-संभाव्यता अहवाल आधीच मंजूर झाला आहे. तसेच, 15 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मान्यता देण्यात आली होती.
लवाद-1 च्या कोणत्याही नियमांचा भंग होणार नाही, याची पूर्ण जबाबदारी कृष्णा खोरे विकास महामंडळावर असेल. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अतिरिक्त आर्थिक भार असणारा कोणताही बदल करता येणार नाही.






