विशाल शिंदे

पुणे : पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील नसरापूरजवळील चेलाडी फ्लायओव्हर परिसरातील नव्याने डांबरीकरण करण्यात आलेला रस्ता पहिल्याच जोरदार पावसात उखडू लागल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वीच संबंधित यंत्रणेकडून जुना रस्ता मशिनरीच्या सहाय्याने उकरून नव्याने डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, सततच्या पावसामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नव्याने तयार केलेला रस्ता इतक्या कमी कालावधीत उखडणे हे निकृष्ट दर्जाच्या कामाचे द्योतक आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी हा परिसर धोकादायक ठरत आहे.
काल रात्री याच ठिकाणी एका दुचाकीस्वाराचा गंभीर अपघात झाला. खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात त्याचे वाहन घसरल्याने तो जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापूर्वीही या परिसरात अनेक लहान-मोठे अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.
नागरिकांचा आरोप आहे की, पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण होते. अनेक वेळा तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्ती केली जाते; मात्र काही दिवसांतच रस्ता पुन्हा उखडतो. त्यामुळे कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही दर्जेदार आणि टिकाऊ काम होत नसल्याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याशिवाय या महामार्गावरील अनेक ठिकाणचे सेवा रस्ते (सर्व्हिस रोड) अद्याप अपूर्ण आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अपूर्ण सेवा रस्ते, वारंवार पडणारे खड्डे, पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या आणि वाढते अपघात हे पुणे–सातारा राष्ट्रीय महामार्गावरील प्रमुख प्रश्न बनले आहेत.
स्थानिक नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. चेलाडी फ्लायओव्हर परिसरातील रस्त्याची उच्चस्तरीय गुणवत्ता तपासणी करून दोषी ठेकेदारावर कारवाई करावी, तसेच खड्ड्यांची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नागरिकांचा इशारा आहे की, केवळ तात्पुरते डांबर टाकून प्रश्न सोडविण्याऐवजी दर्जेदार आणि टिकाऊ कामे झाली पाहिजेत. अन्यथा भविष्यात या खड्ड्यांमुळे एखादा मोठा अपघात किंवा जीवितहानी झाल्यास त्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि संबंधित यंत्रणांवर राहील.






