फुरसुंगी : आईला ओरडण्याबाबत जाब विचारल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावाने भावालाच विटेने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना मंतरवाडी परिसरात 23 जुलै रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश कोंडीबा बरकडे (वय ३१) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी श्रीराम कोंडीबा बरकडे (वय ३३, रा. श्रीरामकृष्ण कॉलनी, मंतरवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीराम बरकडे हे वडकी येथे मॅन्युफॅक्चरिंग व्यवसाय करतात. एकाच इमारतीत श्रीराम, त्यांची पत्नी व दोन मुले तर भाऊ गणेश बरकडे हा त्याची पत्नी, दोन मुले आणि आई ठकुबाई बरकडे यांच्यासह राहत आहे.

पाण्याचा टँकर आल्यामुळे आई ठकुबाई बरकडे मोठ्याने ओरडत होती. त्यावेळी श्रीराम खाली पार्किंगमध्ये जाऊन आईला, “कशाला ओरडतेस?” असे विचारले. याच गोष्टीचा राग मनात धरून भाऊ गणेश याने श्रीराम यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. श्रीराम यांची पत्नी ज्योती यांनी वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, “थांब, तुला दाखवतो आता,” अशी धमकी देत गणेश याने जमिनीवर पडलेली विट उचलून श्रीराम यांच्या डाव्या डोळ्यावर तसेच दोन्ही पायांवर जोरदार वार केले. या हल्ल्यात श्रीराम गंभीर जखमी होऊन खाली कोसळले.
घटनेनंतर पत्नी ज्योती यांनी त्यांना फुरसुंगी पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठविले. उपचारानंतर श्रीराम बरकडे यांनी भावाविरुद्ध तक्रार दाखल केली. या प्रकरणी गणेश बरकडे याच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ, धमकी देऊन दुखापत केल्याप्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.






