Accident News : बिहारच्या पटना-गया-डोभी चौपदरी महामार्गावर बुधवारी मध्यरात्री एक वाजता एक भीषण अपघात घडला. परसा बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुईया वळणावर ग्रँड विटारा कारने ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा पूर्णपणे चुराडा झाला. तर गाडीत अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी अक्षरशः कटरचा वापर करावा लागला.

या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावं राजेश कुमार, संजय कुमार सिन्हा, कमल किशोर, प्रकाश चौरसिया आणि सुनील कुमार अशी आहे. हे सर्वजण कीटकनाशके आणि कृषी उत्पादनांशी संबंधित व्यवसाय करत होते. ते ग्रँड विटारा कारमधून प्रवास करत असताना हा अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘कारचा वेग खूप जास्त होता. जेव्हा कार ट्रकला धडकली तेव्हा खूप मोठा आवाज झाला होता. हा अपघात इतका भयंकर होता की, कारचा जागीच चुराडा झाला. या अपघातात कार ट्रकमध्ये अडकली होती. या घटनेत पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले. कटरच्या मदतीने कारचा पत्रा कापण्यात आला आणि क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. मृतदेह अत्यंत विद्रूप अवस्थेत होते, ज्यामुळे घटनास्थळाचे दृश्य अतिशय हृदयद्रावक होते.
पोलिसांनी मृतांच्या मोबाईल आणि कागदपत्रांद्वारे त्यांच्या कुटुंबियांना अपघाताची माहिती दिली. राजेश कुमार यांच्या भावाने सांगितले की, ‘सर्वजण फतुहाला गेले होते आणि तिथून पटनाला परत येत असताना हा अपघात घडला. एका मृतदेहाजवळ पडलेल्या फोनवर आलेल्या कॉलमुळे पोलिसांना इतर मृतांची ओळख पटवण्यास मदत झाली. रात्री उशिरा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले.
दरम्यान, प्राथमिक तपासात असे दिसून आले की, कारच्या जास्त वेगामुळे हा अपघात घडला. पोलिस याप्रकरणी आता पुढील तपास करत आहेत.







