मुंबई: कडाक्याच्या (Hot Water Bath Side Effects) थंडीत गरम पाण्याने अंघोळ करणे हे जरी सुखदायक वाटत असले, तरी अति गरम पाणी तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आरोग्य आणि त्वचा रोग तज्ज्ञांच्या मते, गरम पाण्याचा अतिवापर केल्यास त्वचेची नैसर्गिक चमक नष्ट होते आणि केसांचे मोठे नुकसान होऊ शकते. थंडीपासून तात्पुरता आराम देणारी ही सवय दीर्घकाळात आरोग्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते.

गरम पाणी तुमच्या त्वचेसाठी चांगले नसते. गरम पाण्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक तेल आणि आर्द्रता पूर्णपणे निघून जाते. या तेलामुळे त्वचेला जे नैसर्गिक संरक्षक आवरण मिळते, ते कमकुवत होते. परिणामी, त्वचेवर त्वरित खाज येणे, लालसर चट्टे आणि सूज येणे अशा समस्या दिसू लागतात. वारंवार गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी आणि निर्जीव बनते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या लवकर पडू लागतात.
केसांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही गरम पाणी चांगले नाही. गरम पाण्याची वाफ केसांच्या मुळांना कमजोर करते आणि केसांची नैसर्गिक चमक हिरावून घेते. अति गरम पाण्यात जास्त वेळ घालवल्यास रक्ताभिसरण संस्थेवर ताण येतो.
या नुकसानीपासून वाचण्यासाठी तज्ज्ञ कोमट पाणी वापरण्याचा सल्ला देतात. अंघोळीसाठी 10 मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेऊ नये. तसेच, आंघोळीनंतर शरीर हलक्या हाताने पुसून लगेचच त्वचेवर मॉइश्चरायझर लावणे आवश्यक आहे, ज्यामुळे त्वचेची आर्द्रता टिकून राहील.







