मुंबई: बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा एका कायदेशीर वादामुळे चर्चेत आला आहे. ‘काला हिरण: द बॅटल फॉर लेगेसी’ या आगामी चित्रपटाच्या निर्मात्यांना सलमान खानने कायदेशीर नोटीस धाडली असून, या सिनेमाचे चित्रीकरण आणि सर्व प्रकारची प्रसिद्धी तात्काळ थांबवण्याचे फर्मान काढले आहे.

या प्रकरणाची सुरुवात २४ एप्रिल २०२६ रोजी झाली, जेव्हा सलमानच्या कायदेशीर टीमने ही नोटीस बजावली. नोटीसमध्ये असा गंभीर आरोप करण्यात आला आहे की, अक्षय पांडे नावाच्या व्यक्तीने हा चित्रपट सलमानच्या बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणावर आधारित असल्याचे सांगून विविध कलाकारांशी संपर्क साधला होता. एवढेच नाही तर, चित्रपटाची पटकथा आणि पात्रांची माहिती देखील पसरवली जात होती. सलमानच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे की, अभिनेत्याची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता त्यांचे नाव, प्रतिमा आणि वैयक्तिक आयुष्यातील कथित घटनांचा वापर करणे हे ‘पर्सनॅलिटी राइट्स’चे थेट उल्लंघन आहे.

या चित्रपटात सलमान खान आणि गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई यांच्यातील वाद चित्रित केला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. हा चित्रपट केवळ सलमानच्या प्रतिमेला हानी पोहोचवणारा नाही, तर सध्या न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर प्रक्रियेतही अडथळा निर्माण करू शकतो, असा दावा नोटिशीत करण्यात आला आहे.

शुक्रवारी या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्याने सोशल मीडियावर खळबळ उडाली होती. चित्रपटाचा टीझर २० जून रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु आता या कायदेशीर नोटीसमुळे चित्रपट येणार कि नाही यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे.







