Nora Fatehi Controversy : बॉलिवूडची प्रसिद्ध नृत्यांगना नोरा फतेही सध्या एका मोठ्या वादात सापडली आहे. तिच्या आगामी केडी – द डेविल या कन्नड चित्रपटातील सरके चुनर तेरी सरके हे गाणे नुकतेच प्रदर्शित झाले होते. मात्र या गाण्यातील शब्दरचना आणि चित्रीकरण अत्यंत आक्षेपार्ह असल्याचे सांगत सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. या गाण्यात नोरासोबत अभिनेता संजय दत्त देखील दिसत आहे. 15 मार्च रोजी हे गाणे प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच यावर टीकेची झोड उठली.

या गाण्यातील अश्लील शब्द आणि सादरीकरण यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याची तक्रार अनेकांनी केली. नॅशनल ह्युमन राईट्स कमिशनचे सदस्य प्रियंक कानूनगो यांनी देखील यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सुसंस्कृत कुटुंबात बसून पाहण्यासारखे हे गाणे नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मनोरंजन विश्वातील गायक अरमान मलिक आणि दिग्दर्शक ओनिर यांनी देखील सोशल मीडियावरून या गाण्यावर टीका केली असून लेखनाचा दर्जा अत्यंत खालच्या पातळीचा असल्याचे मत मांडले आहे.
वाढता वाद पाहून एका वकिलाने या गाण्याविरोधात सेन्सॉर बोर्डाकडे अधिकृत तक्रार दाखल केली. हे प्रकरण माहिती व प्रसारण मंत्रालयापर्यंत पोहोचल्याने निर्मात्यांची अडचण वाढली होती. अखेर वाढता विरोध पाहून चित्रपट निर्मात्यांनी हे गाणे यूट्यूबवरून हटवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता हे गाणे इंटरनेटवर उपलब्ध नाही. केडी – द डेविल हा चित्रपट 1970 च्या दशकातील बंगळुरूमध्ये घडलेल्या खऱ्या घटनांवर आधारित आहे. यामध्ये दाक्षिणात्य सुपरस्टार ध्रुव सरजा मुख्य भूमिकेत असून संजय दत्त, शिल्पा शेट्टी आणि नोरा फतेही यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट 30 एप्रिल 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.






