दिपक खिलारे
इंदापूर : वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळण्यासाठी उत्तम व्यासपीठ असून यातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो असे प्रतिपादन डॉ. राहुल जाधव यांनी केले.
मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रमशाळा व मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात आयोजित (दि.१७) स्नेहसंमेलनाप्रसंगी डॉ.राहुल जाधव बोलत होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते माता रमाई, जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे दिवंगत अध्यक्ष रत्नाकर मखरे (तात्या) यांच्या प्रतिमांना पुष्पहार तसेच वृक्षपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.
यावेळी प्रशालेतील इ.१ ली ते इ.१२ वी च्या विद्यार्थ्यांनी विविध हिंदी, मराठी, इंग्रजी गीतावर नृत्याविष्कार सादर केले. यात वैयक्तीक गायन, नृत्य, समूह नृत्य, नाटकं, विविध वेशभूषा या कार्यक्रमांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी विविध कला व गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांना उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाडात दाद दिली व रोख स्वरूपात बक्षिसे देत कौतुकही केले.
या स्नेहसंमेलानास माधवी देसाई, गणेश महाजन, अविनाश कोथमिरे, मधुकर जगताप, भास्कर साळवे या प्रमुख पाहुण्यांसह संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला रत्नाकर मखरे, उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, कार्याध्यक्ष ॲड. राहुल मखरे, सचिव ॲड. समीर मखरे, संचालक गोरख तिकोटे, संजय कांबळे, अस्मिता मखरे, डॉ. अनार्या मखरे व राजाभाऊ गायकवाड, नानासाहेब चव्हाण, ॲड. किरण लोंढे, ॲड. सूरज मखरे, ॲड. अण्णासाहेब कडवळे, अक्षय मखरे, सागर गानबोटे, पालकवर्ग, आजी -माजी विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांचा व पालकवर्गाचा सत्कार प्रशालेच्या वतीने गुलाबपुष्प देऊन केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. सदर वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांच्या नियोजनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप, स्वप्नाली कदम यांनी केले. तर आभार उपप्राचार्या सविता गोफणे यांनी मानले.