लोणी काळभोर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या `मेरी माटी, मेरा देश` उपक्रमाला प्रतिसाद देत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी नुकतीच ७५ रोपट्यांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित उपक्रमात जमलेल्या विद्यार्थ्यांनी एक रॅली काढून पर्यावरण संवर्धनासह नशामुक्तीचादेखील संदेश दिला आहे.
लोणी काळभोर येथील एमआयटी विद्यापीठात `मेरी माटी, मेरा देश` उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड, यूपीईएस विद्यापीठ डेहराडूनचे कुलगुरु डॉ.. सुनील राय, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक प्रा. विशाल पाटील, विद्यार्थी कल्याण मंडळाचे सहयोग संचालक डॉ. सुराज भोयर पेरा इंडियाचे सीईओ प्रा. हनुमंत पवार, सहायक कुलसचिव विशांत चिमटे तथा प्रदीप कुलकर्णी यांच्यासह एनएसएस कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी `मेरी माटी, मेरा देश` उपक्रमाची घोषणा केली होती. या उपक्रमाअंतर्गत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यविरांना विविध प्रकारच्या विधायक कार्यातून आदरांजली देणे हा होता. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर रोपट्यांची लागवड करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी घेतली. या वेळी विद्यार्थ्यांनी रॅली काढून पर्यावरण संवर्धान तथा नशामुक्तीचा संदेशही दिला.
दरम्यान, या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी ७५ रोपट्यांची लागवड करून ती रोपटी जगवण्याचा, तसेच जीवनात कधीही मादक आणि नशा आणणाऱ्या पदार्थांचे सेवन न करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. याशिवाय या वेळी विविध देशभक्तिपर गीते सादर करण्यात आली.
यावेळी बोलताना डॉ. मंगेश कराड म्हणाले की, आज जगभरात पर्यावरण बदलाचे गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. अशा स्थितीत पर्यावरण संवर्धन करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्षारोपणाची आवश्यकता आहे. म्हणूनच आज राबवण्यात आलेला हा उपक्रम खूपच महत्वाचा ठरतो. याशिवाय देशाला कुठल्याही प्रकारच्या नशेपासून मुक्त करण्यासाठी प्रत्येक भारतीय युवकाने पुढे येऊन कार्य करणे गरजेचे आहे. यातूनच उद्याचा एक सशक्त भारत तयार होईल.