पुणे : औंध परिसरात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी दुपारी दरोडेखोरांनी सोन्याच्या दुकानाला लक्ष्य केले. मात्र, सराफाने केलेल्या धाडसी प्रतिकारामुळे तिघांचा दरोड्याचा प्रयत्न फसला. ही घटना शुक्रवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ओंकार कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रामदेव ज्वेलर्स येथे घडली.

या दुकानाचे मालक नेमाराम चौधरी (वय 58) शुक्रवारी दुपारी दुकानात एकटेच होते. त्याच वेळी तिघे अज्ञात चोरटे कोयते व तलवारींसह दुकानात घुसले. त्यांनी चौधरी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र चौधरी यांनी कसलीही भीती न बाळगता प्रखर प्रतिकार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला, परंतु सराफाच्या धाडसामुळे चोरट्यांना यश मिळू शकले नाही.
घाबरविण्याच्या प्रयत्नात चोरट्यांनी चौधरी यांना ओढत दुकानाबाहेर आणले आणि त्यांच्यावर शस्त्रांनी वार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी चौधरी यांचा आवाज ऐकून शेजारील दुकानदार व नागरिक जमा होऊ लागले. वाढत्या गर्दीचे वातावरण पाहून चोरट्यांनी तातडीने पळ काढला.
चोरटे मोटारसायकलवरून पळून जाण्याच्या तयारीत असतानाच चौधरी यांनी धाडस दाखवत त्यांचा पाठलाग केला. त्यांनी चोरट्यांची दुचाकी लाथ मारून खाली पाडली. त्यामुळे तीनही चोरट्यांना दुचाकी सोडून विधाते वस्तीकडे पळून जावे लागले. या धाडसी कृतीमुळे चोरटे हातात काहीही न लागता पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच चतु:श्रृंगी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भोजनावळे यांनी सांगितले की, “चोरटे केवळ 40 सेकंद दुकानात होते. त्या काळात त्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र काहीही चोरी करू शकले नाहीत. चौधरी यांनी दिलेला प्रतिकार आणि तत्परतेने वागल्यामुळे मोठी हानी टळली.”
सध्या पोलिसांकडून चौधरी यांचा जबाब घेतला जात असून घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. दरोडेखोरांचा नेमका उद्देश फक्त चोरीचाच होता की त्यामागे आणखी काही कारण दडले होते, याचाही तपास सुरू आहे.
औंधसारख्या गजबजलेल्या भागात दिवसा-दिवसा झालेल्या या धाडसी दरोड्याच्या प्रयत्नामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सराफाने दाखवलेल्या धाडसामुळे गुन्हेगारांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले गेले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.






