Pune News : पुणे : सिंहगड परिसरातील एका फार्महाऊस मध्ये बिबट सदृष वन्य प्राण्याची शिकार करुन त्याचे अवयव लपवून ठेवल्याची घटना मांडवी बुद्रुक परिसरात उघडकीस आली आहे. वन विभागाने छापा टाकून नख्यांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी दोन सराईत शिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल
याप्रकरणी विश्वजीत जाधव व अभिजित जाधव यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम व विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेजण सध्या फरार आहेत.
वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी खुर्द या गावच्या हद्दीतील शेट्टी फार्महाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन संबधितांनी अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती. माहिती मिळताच भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर छापा टाकला. (Pune News)
फार्महाऊसची तपासणी करत असताना कपाटात एका कापडामध्ये बिबट सदृष प्राण्याचा नख्यांसह पंजा लपवून ठेवलेला असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. याप्रकरणी विश्वजीत जाधव व अभिजित जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ते दोघेही फरार झाले आहेत. याबाबत भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ अधिक तपास करत आहेत. (Pune News)