वाघोली: शहरातील सराफ दुकानदारांची बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक करणारी टोळी गुन्हे शाखा युनिट – 6 च्या पोलिसांनी जेरबंद केली आहे. सोमवारी (ता. 18) वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खांदवेनगर, वाघोली परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे.

रोहित संजय गोरे, (वय -30, रा. ओम अपार्टमेंट, मोहन नगर, धनकवडी), अजय दत्तात्रय पवार (वय -28, रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक), ओम सुंदर खरात, वय 23, रा. गोगावले बिल्डिंग, म्हसोबा मंदिर जवळ, वडगाव बुद्रुक) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून तब्बल 8 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी गुन्हे शाखा युनिट 6 चे पथकातील सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे हद्दीत गस्त घालीत होते. पुणे परिसरात गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना त्यांच्या गोपनीय बातमीद्वारे माहिती मिळाली की, पुणे शहरामध्ये ज्वेलर्स दुकानांमध्ये बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून आर्थिक फसवणूक करणारे इसम हे खांदवेनगर, वाघोली परिसरात फिरत आहेत.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जावुन तपास केला असता सदर ठिकाणी वरील तिघेजण आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे वरीलप्रमाणे सांगितली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंदननगर, कळेपडळ, पर्वती, आंबेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण ०४ गुन्हे केल्याची माहिती दिली.
दरम्यान, सदर आरोपींकडुन 3 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपये किमतीचे मोबाईल फोन, 4 लाख रुपये किमतीचे हॉल मार्क असलेले बनावट सोन्याचे दागिने असा एकुण 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. नमुद आरोपींना पुढील कारवाई कामी चंदननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे यांच्यासह पथकातील पोलीस अंमलदार सारंग दळे, बाळासाहेब सकटे, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, गिरीष नाणेकर, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, निर्णय लांडे, सुहास तांबेकर, सचिन पवार, नेहा तापकीर, ऋषीकेश ताकवणे, नितिन धाडगे, ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, बाळासाहेब तनपुरे, प्रतिक्षा पानसरे, कीर्ती मांदळे, सोनाली नरवडे यांच्या पथकाने केली आहे.







