धुळे : शिरपूर तालुक्यात 8 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला सोमवारी हिंसक वळण मिळाले. आंदोलकांची समजूत घालण्यासाठी गेलेल्या शिरपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी मागून धारदार हत्याराने हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आठ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेच्या निषेधार्थ आदिवासी संघटनांच्या वतीने मूकमोर्चा काढण्यात आला. पीडित मुलीला न्याय मिळावा आणि आरोपीवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी पोलीस उपअधीक्षक सुनील गोसावी यांच्याकडे केली.
मात्र, यानंतर काही वेळात गुजराती कॉम्प्लेक्ससमोर काही तरुणांनी अचानक रास्तारोको आंदोलन सुरू केले. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची गर्दी झाली आणि वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक जयपाल हिरे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करून आंदोलन शांततेत मागे घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस दलाकडून सौम्य बळाचा वापर करण्यात आला. परंतु गोंधळाच्या स्थितीत हिरे यांच्यावर अज्ञात व्यक्तींनी मागून धारदार शस्त्राने हल्ला केला.
तत्काळ त्यांना शिरपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर अधिक उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
शहरात तणावाचे वातावरण:
या घटनेनंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले असले तरी शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
या संपूर्ण घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पोलीस अधीक्षकांनी तपासाला गती देण्याचे आदेश दिले आहेत. हल्लेखोरांचा लवकरच पर्दाफाश करण्यात येईल, असे आश्वासन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहे.







