महेंद्र शिंदे

खेड शिवापूर : जुन्या वादाच्या कारणावरून वेळू (ता. भोर) येथे शनिवारी पहाटे अडीज वाजण्याच्या सुमारास काही तरुणांच्या अंगावर बस आणि टेम्पो चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत अविनाश सातपुते (वय १७, रा. कात्रज कोंढवा रोड, मुळगाव मार्डी, ता. उत्तर सोलापूर) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी राजगड पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
समीर मोहम्मद शेख (वय २२), अनिकेत बाळू शिंदे (वय २४), तनवीर तानाजी पांगारे (वय १८), दिगंबर उर्फ साहिल अनिल पांगारे (वय २५, चौघेही रा. वेळू, ता. भोर, पुणे) आणि सुरज विलास पवार (वय २८, रा. वरवे) अशी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी कलावती संतोष सातपुते (वय ३६, रा. कात्रज कोंढवा रोड) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आरोपी समीर शेखचा भाऊ अमिन शेख याच्यासोबतच्या जुन्या वादातून ही घटना घडली आहे. 16 ऑगस्ट रोजी पहाटे अडीज वाजण्याच्या सुमारास आरोपींनी भांडणे मिटविण्याच्या उद्देशाने अविनाश व त्याच्या मित्रांना वेळू फाट्यावर बोलावून घेतले.
त्यावेळी समीर शेख याने आपल्या साथीदारांसोबत संगणमत करून प्रथम एक बस प्रदीप मुजमुले, हर्षद घुगे व ऋषी जाधव या तरुणांवर चालवून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. दहा मिनिटांनी अविनाश सातपुते व त्याचे मित्र पुन्हा वेळू फाटा येथे उभे असताना आरोपींनी यावेळी एक टेम्पो त्यांच्या अंगावर घातला. या टेम्पोच्या चाकाखाली येऊन अविनाशचा मृत्यू झाला. त्याचे मित्र प्रदीप मुजमुले, शंभू अडागळे, हर्षद घुगे, सुमित राठोड व ऋषी जाधव यांनाही जिवे मारण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते थोडक्यात बचावले. याप्रकरणी कलावती सातपुते यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. राजगड पोलिस पुढील तपास करत आहेत.






