पुणे: पुण्यात पोलिस अधिकाऱ्यांकडून सामान्य नागरिकांशी गैरवर्तनाच्या घटना वाढताना दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी वाहतूक विभागातील कर्मचाऱ्याने कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर आले आहे. यावेळी पुणे पोलिस दलातील एका उपनिरीक्षकावर मेडिकल चालकाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात संबंधित उपनिरीक्षकासोबत असलेल्या व्यक्तीने देखील मेडिकल चालकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

ही घटना 13 ऑगस्ट रोजी संध्याकाळी नारायण पेठ परिसरात घडली असून, सीसीटीव्हीमध्ये संपूर्ण प्रकार कैद झाला आहे. संबंधित अधिकारी विजय सरवार हे चंदन नगर पोलीस ठाण्यात परिविक्षाधीन (प्रोबेशनल) पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. फिर्यादी महादेव चौरे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ते मातोश्री मेडिकल येथे झाडू मारत होते. त्या वेळी त्यांच्या दुकानासमोर उपनिरीक्षक विजय सरवार हे आपल्या मित्रांसह उभे होते.

दुकानासमोर उभे राहिल्यामुळे चौरे यांनी त्यांना बाजूला होण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात वाद झाला. वादाच्या दरम्यान विजय सरवार आणि त्यांच्यासोबत असलेले हनुमंत रायकर यांनी चौरे यांना मारहाण करून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हा प्रकार स्पष्टपणे दिसत असून, चौरे यांच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवला गेला आहे.

दरम्यान, याच प्रकरणात दुसऱ्या बाजूला सुमित रायकर यांनी महादेव चौरे यांनी त्यांना शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिल्याची तक्रार दिली आहे. त्यावरून मेडिकल चालकाविरुद्ध देखील अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अशा प्रकारे या घटनेत दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध तक्रारी नोंदवल्यामुळे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे.







