Loni Kalbhor लोणी काळभोर, ता. 12 : पुणे शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटनांमध्ये आणखी एका धक्कादायक प्रकाराची भर पडली आहे. काम आटोपून मध्यरात्री घरी परतणाऱ्या दोन झोमॅटो डिलिव्हरी बॉयवर चार अनोळखी तरुणांनी जीवघेणा हल्ला करत दगडाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. हि घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोल नाक्याजवळ रविवारी (ता.१० मे)रात्री घडली. या घटनेत दोघे गंभीर जखमी झाले आहेत. Loni Kalbhor
या प्रकरणी प्रदीप आबाजी गरड (वय २१) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी तरुणांविरोधात गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप गरड आणि त्यांचा चुलत भाऊ संतोष गरड हे दोघेही झोमॅटो ऑनलाईन पार्सल डिलिव्हरीचे काम करून उदरनिर्वाह करतात. दोघेही लोणी काळभोर येथील पांढरे मळा परिसरात भाड्याने राहत असून, १० मे रोजी रात्री उशिरापर्यंत डिलिव्हरीचे काम पूर्ण करून घरी परतत होते. Loni Kalbhor

लोणी काळभोर टोल नाक्याजवळील इराणी हॉटेलसमोर ते चहा पिण्यासाठी रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास थांबले. त्यावेळी तेथे आधीपासून उभ्या असलेल्या दोन अनोळखी तरुणांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. “तुम्ही कुठले?” अशी विचारणा करत त्यांनी दोघांना गाठले. “लोणी काळभोरमध्ये राहतो,” असे उत्तर दिल्यानंतर अचानक वातावरण तापले.“आम्हाला ओळखत नाही का?” म्हणत त्या तरुणांनी वाद सुरू केला. त्यानंतर त्यांनी मोबाईलवरून आणखी दोन जणांना बोलावून घेतले. काही क्षणातच चौघांनी मिळून दोन्ही डिलिव्हरी बॉयना घेरत शिवीगाळ आणि दमदाटी सुरू केली. Loni Kalbhor
यानंतर हल्लेखोरांनी थेट दगड उचलून मारहाण सुरू केली. एका आरोपीने प्रदीप गरड यांच्या डोक्यावर आणि हातावर दगडाने प्रहार केला, तर दुसऱ्या आरोपीने संतोष गरड यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना रक्तबंबाळ केले. चौघांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. जीव वाचवण्यासाठी दोघांनी तेथून पळ काढला आणि जवळील पत्र्याच्या शेडमागे लपून बसले. त्यानंतर त्यांनी तातडीने डायल ११२ वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जखमींना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आले. Loni Kalbhor
या गोंधळात संतोष गरड यांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि मोबाईल कव्हरमध्ये ठेवलेली रोख रक्कमही हरवली. फिर्यादी प्रदीप गरड यांनी आरोपींचे चेहरे लाईटच्या उजेडात स्पष्ट दिसले असून, त्यांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकतो. लोणी काळभोर पोलिसांनी चार अनोळखी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), १२५, ३५१(२), ३५१(३), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे. सध्या टोल नाका आणि हॉटेल परिसरात मध्यरात्रीनंतर वाढणारी गुंडगिरी आणि टोळक्यांची दहशत यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. Loni Kalbhor






