मल्लपूरम: 12 वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Crime News) केल्याच्या भयानक प्रकरणात मल्लपूरम येथील विशेष पोस्को न्यायालयाने तिची जन्मदाती आई आणि आईचा प्रियकर या दोघांना 180 वर्षांची सक्तमजुरी आणि प्रत्येकी 11 लाख 70 हजार रुपयांचा (एकूण 23 लाख 40 हजार रुपये) दंड अशी अत्यंत कठोर शिक्षा सुनावली आहे. न्यायमूर्ती अशरफ ए. एम. यांनी मंगळवारी (4 नोव्हेंबर) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. विशेष सरकारी वकील सोमसुंदरन ए. यांच्या माहितीनुसार, विवाहित असलेली महिला आपल्या नवऱ्यापासून वेगळी राहात होती. ती आरोपी प्रियकराच्या संपर्कात फोनद्वारे आली आणि त्याच्यासोबत पळून गेली. दोघेही मुलीसह पळक्कड आणि मल्लपूरम येथे भाड्याच्या घरात राहत होते.

याच काळात, 33 वर्षीय आरोपी प्रियकराने डिसेंबर 2019 ते नोव्हेंबर 2020 आणि पुन्हा डिसेंबर 2020 ते ऑक्टोबर 2021 या कालावधीत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. मुलीची आई या सर्व घृणास्पद गुन्ह्यांना प्रोत्साहन देणारी आणि सहाय्य करणारी म्हणून दोषी ठरली. आईने केवळ अत्याचार मुकाट्याने पाहिले नाही, तर मुलीला गप्प ठेवण्यासाठी तिच्या मेंदूत ‘सीसीटीव्ही चिप’ बसवल्याची भीती दाखवून धमकावले. इतकेच नव्हे, तर अत्याचारापूर्वी तिला बिअर पाजली जात होती आणि अश्लील व्हिडिओ दाखवले जात होते, असे चौकशीत उघड झाले.
हे प्रकरण 2021 मध्ये मल्लपूरम महिला पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आले. आरोपी महिला आपल्या पालकांविरुद्ध तक्रार देण्यासाठी पोलिसांकडे गेली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी महिलेच्या पालकांना भेटायला बोलावले असता, त्यांनी नातीला भेटायचे आहे असे सांगितले. तेव्हा आरोपींनी भेटू दिले नाही. त्यानंतर शेजाऱ्यांनी मुलीवर अत्याचार होत असल्याची माहिती दिल्यावर चाइल्डलाइनला कळवण्यात आले आणि मुलीला सुरक्षित केंद्रात हलवल्यानंतर तिने सर्व सत्य सांगितले.
न्यायालयाने दोघांनाही बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO), भारतीय दंड संहिता आणि जुवेनाईल जस्टीस कायद्यातील विविध कलमांखाली दोषी ठरवले. पोस्को कायद्याच्या कलम 5(l), 6(1), 5(n) आणि 5(p) सह 6(1) अंतर्गत दोषी ठरवत प्रत्येक गुन्ह्यासाठी 40 वर्षांची सक्तमजुरी ठोठावण्यात आली असून, दंडाची संपूर्ण रक्कम पीडित मुलीला देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाला पीडित भरपाई योजना अंतर्गत आणखी नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. दोन्ही दोषींना तवानूर कारागृहात पाठवण्यात आले असून, सर्व शिक्षा एकाचवेळी (concurrently) भोगायच्या आहेत. POCSO कायद्यातील महिलेवर झालेली ही सर्वाधिक कठोर शिक्षा मानली जात आहे.







