chha. sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोयगाव तालुका येथील मोहळाई ग्रुप ग्रामपंचायतीत अवघ्या साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या पिंप्री अंतुर गावात चार महिन्यांत तब्बल ३,४४८ जन्मनोंदी करण्यात आल्याचे आढळले. या कालावधीत केवळ आठ मृत्यूंच्या नोंदी आहेत. आकडेवारीतील हा प्रचंड तफावत संशय निर्माण करणारा ठरला आणि चौकशीअंती या सर्व नोंदी बोगस असल्याचे स्पष्ट झाले.

१ एप्रिल ते २ ऑगस्ट २०२५ दरम्यान ‘सीआरएस’ (Civil Registration System) पोर्टलवरील ग्रामपंचायतीच्या युजर आयडीचा वापर करून या नोंदी करण्यात आल्या. विशेष म्हणजे संबंधित युजर आयडी प्रत्यक्षात वापरात नसल्याचे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले. मग इतक्या मोठ्या प्रमाणावर नोंदी कशा झाल्या, हा प्रश्न निर्माण झाला. जिल्हा आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासात हा पासवर्ड बिहारमधून हॅक करून गैरवापर केल्याचे समोर आले.
या प्रकारामुळे जन्म-मृत्यू नोंदणी व्यवस्थेच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. जन्मनोंद ही केवळ कागदोपत्री प्रक्रिया नसून ती नागरिकत्व, शाळा प्रवेश, शासकीय योजना आणि ओळखपत्रांसाठी अत्यंत महत्त्वाची कडी असते. मोठ्या प्रमाणावर बोगस नोंदी झाल्यास त्याचा वापर बेकायदेशीर कागदपत्रे तयार करण्यासाठी होऊ शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यापूर्वी जिल्ह्यात बांगलादेशी नागरिकांच्या बोगस नोंदींचा मुद्दा उपस्थित केला होता. या नव्या घडामोडींमुळे त्या आरोपांना नव्याने अधोरेखित केल्याची चर्चा सुरू आहे.
राज्याच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागाने सर्व संशयित नोंदी तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपासात या सायबर घोटाळ्यामागील नेमके जाळे उघड होण्याची शक्यता आहे.







