दिल्ली : नवी दिल्लीत एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच ओळखीच्या मित्राने आणि त्याच्या तीन साथीदारांनी सामूहिक अत्याचार करून तिची निघृण हत्या केली असल्याची संतापजनक घटना समोर आली आहे . याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी वेगाने कारवाई करत अवघ्या 72 तासांत मुख्य आरोपीसह चार जणांना ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 10 सप्टेंबरच्या संध्याकाळी पीडित मुलगी तिच्या एका 17 वर्षांच्या मित्राला भेटण्यासाठी गेली होती. ती शिक्षण सोडून कुटुंबाला आर्थिक मदत करण्यासाठी नोकरी शोधत होती. भेटीदरम्यान त्या मुलाने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने या प्रकरणी पोलिसांत जाण्याची धमकी दिल्यानंतर, नशेत असलेल्या आरोपीने त्याच्या तीन इतर मित्रांना तेथे बोलावून घेतले.

त्यानंतर चौघांनी मिळून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. 11 सप्टेंबरच्या पहाटे आरोपींनी तिला कुशक रोडजवळील एका मोकळ्या शेतात नेले आणि तिच्यावर चाकूने अनेक वार करून तिचा जीव घेतला. तिची हत्या केल्यानंतर आरोपींनी मृतदेह चिखल आणि पालापाचोळ्याखाली लपवून टेम्पोतून पळ काढला. 13 सप्टेंबर रोजी या मुलीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला.

घटनास्थळी कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील 50 हून अधिक CCTV कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजमध्ये दिसलेल्या एका संशयित टेम्पोचा मागोवा घेत पोलीस खड्डा कॉलनीपर्यंत पोहोचले. टेम्पो चालकाची कसून चौकशी केल्यावर या गुन्ह्याचा उलगडा झाला. पोलिसांनी 19 वर्षीय शिवम उर्फ सुदामा याला अटक केली असून त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेले 2 चाकू, रक्ताने माखलेले कपडे आणि गुन्ह्यात वापरलेला टेम्पो जप्त केला आहे.
वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासणीनंतर या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.







