पुणे: अल्पवयीन मुलीचे अपहरण व लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सात वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या प्रतीक किसान कळणे या आरोपीस मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

विशेष पीओसीएसओ प्रकरण (क्र. 294/2014) मध्ये अतिरिक्त सत्र न्यायालय, पुणे यांनी 16 मे 2025 रोजी आरोपीस भारतीय दंड संहिता कलम 363, 507 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 11 सह 12 अंतर्गत दोषी ठरवत सात, दोन आणि तीन वर्षांच्या सक्तमजुरीच्या शिक्षा ठोठावल्या होत्या. मात्र, अपहरणासाठी कलम 366(A) अंतर्गत तो निर्दोष ठरविण्यात आला होता. सर्व शिक्षा एकाचवेळी चालविण्याचे आदेश होते.
न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नमूद केले की, सदर प्रकरण हे गुन्हेगारी हेतूचे नसून ‘प्रेमसंबंधाचा’ मामला आहे. पीडिता त्या वेळी 17 वर्षे 2 महिन्यांची होती आणि तिने स्वतः आरोपीसोबत राहण्याचा आग्रह धरला होता. आरोपीने परिस्थितीचे स्पष्टीकरण दिले असले तरी पीडिता त्याच्यासोबत जाण्यावर ठाम होती, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. 14 ऑगस्ट 2025 रोजी न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांचे खंडपीठाने आरोपीस 5,000 रुपयांच्या पी.आर. बाँडवर जामीन मंजूर केला.
दरम्यान, सदर आरोपीस शिक्षा झाल्यानंतर त्याला येरवडा कारागृहात पाठविण्यात आले होते. त्यानंतर त्याने अॅड. विपुल दुशींग व अॅड. नितीन भालेराव यांच्या मार्फत उच्च न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलात अॅड. तन्मय काटे, आकाश चिकटे, अॅड. नितीन भालेराव व अॅड. संग्राम शिंदे यांनी बाजू मांडली.






