पुणे : पाण्याच्या मोटारीचा दर जास्त लावल्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी दुकानात घुसून मालकासह कामगाराला रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुळशीतील धमालेवस्ती येथे शुक्रवारी (ता.२० ) दुपारी चार वाजता घडली आहे.
याप्रकरणी महेश अरूण जोगदंड (वय. १९, रा. थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी महेश जोगदंड याचे मुळशी येथे श्री साई बोअरवेल नावाचे दुकान आहे. या दुकानात आरोपी मोटार खरेदीसाठी आला. आरोपीने मोटारीचे कोटेशन मागवले. त्यानंतर मोटारीचे दर जास्त वाटल्याने त्याने फिर्यादी महेश जोगदंड यांच्याबर हुज्जत घालण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आरोपीने इतर पाच ते सहा साथीदार बोलावून फिर्यादी व त्यांचा कामगार यांना शिवीगाळ करत रॉडने व लाथाबुकक्याने मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांचा कामगार दोघे जखमी झाले. गर्दी जमलेली पाहून सगळे आरोपी तेथून पसार झाले.
याप्रकरणी महेश जोगदंड यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हिंजवडी पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.