जिंती, ता. 21: भिलारवाडी (ता. करमाळा ) येथील मकाई सहकारी साखर कारखान्यातून तब्बल चार लाख रुपयांच्या मशिनरी साहित्याची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली होती. मात्र, या प्रकरणाचा छडा लावत करमाळा पोलिसांनी अवघ्या एका दिवसात चार आरोपींना अटक केली आहे. करमाळा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

कृष्णा सतिश माने (वय 26), नवनाथ सुनिल दिवसे (वय 32), ज्ञानेश्वर दत्तु अंबोधरे (वय 23, सर्व रा. भिलारवाडी ता. करमाळा) व सलाऊद्दीन अजिज रहमान अन्सारी (वय 25 रा. भिगवण ता. इंदापुर मुळ रा. श्री दत्तगंज ता. उत्तरोला जि. बलरामपुर राज्य उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी कारखान्याचे जनरल मॅनेजर हरीश्चंद्र प्रकाश खाटमोडे (वय 46) यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीश्चंद्र खाटमोडे हे मकाई सहकारी साखर कारखाना, भिलारवाडी (ता. करमाळा) येथे 2014 पासून कार्यरत आहेत. संबंधित साखर कारखाना फेब्रुवारी 2023 पासून बंद असून, तेथील मशिनरी व साहित्याच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. 14 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास कारखान्याच्या मागील बाजूस असलेल्या बगॅस शेडजवळील सीसीटीव्ही कॅमेरे अचानक बंद पडल्याचे सुरक्षारक्षक महादेव विलास अनपट यांच्या लक्षात आले.
सुरक्षारक्षक महादेव अनपट यांनी पाहणी केली असता शेडजवळ उघड्यावर ठेवलेले काही मौल्यवान साहित्य गायब असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ ही माहिती व्यवस्थापनाला दिली. यानंतर कारखाना प्रशासनाने तपासणी केली असता इलेक्ट्रीक मोटारमधील बेअरिंग, ब्रास मटेरियल, कॉपर वायर आणि जी.एम. बुश असा एकूण सुमारे 4 लाख रुपयांचा माल चोरीस गेल्याचे उघड झाले.
दरम्यान, चोरीस गेलेल्या मालामध्ये 20 लहान-मोठे बेअरिंग असून त्यांची किंमाल सुमारे 95 हजार रुपये, 90 हजार रुपये किंमतीचे 57 किलो ब्रास मटेरियल, 1 लाख 50 हजार रुपयांची कॉपर वायर, 65 हजार रुपये किंमतीची 40 किलो जी.एम. बुश असा सुमारे 4 लाख रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता. याप्रकरणी हरीश्चंद्र खाटमोडे यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल होताच, करमाळा पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तांत्रिक तपास, स्थानिक माहिती आणि चौकशीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासांत चार आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी कैलास अशोक विटकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला आहे. पोलिसांचे एक पथक आरोपीच्या मागावर आहे. पुढील तपास पोलीस नाईक अश्पाक शेख करत आहे.
ही उल्लेखनीय कामगिरी करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजित उबाळे, अश्पाक शेख, मनीष पवार, वैभव ठेंगल, अर्जुन गोसावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. करमाळा पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.






